Wednesday, 1 May 2024

जि. प.उच्च प्राथमिक शाळा शेरी. 

सुट्टीतील हसत खेळत शिकू इंग्रजी 

शब्दांचा खेळ खेळण्यासाठी खालील लिंक ला स्पर्श करा. 👇

https://wordwall.net/resource/57093009 




Tuesday, 30 April 2024

बिभत्स आणि अश्लील गीतांमधून आपण आपल्या माता भगिनींचा अपमान करत नाही का ?

आपण अशा जगात राहतो की,ज्यात  महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा समाज माध्यमांवर अर्थात सोशल मीडियावरही निषेध होतो आणि दुसरीकडे महिलांवर लिहिल्या गेलेल्या बिभत्स आणि अश्लील गाण्यांना आणि संवादांना सुपरहिट होतांना बघतो...

अशा गीतांमधून आपण आपल्या माता भगिनींचा अपमान करत नाही का ?

अशा वेळेला वाटते की जगात माता भगिनींसोबत आपलं असणार भावाचं,मुलाचं ,वडिलांचं,काकांचं, पुतण्यांचं, भाच्यांच किंवा इतर कुठलही नातं महत्वाचं आहेच जे आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा अधिक वेगळं आणि सुसंस्कृत करतं, की मग जगात फक्त दोनच जाती स्त्री आणि पुरुष बस एवढंच...

कारण स्त्री म्हणजे उपभोग्य वस्तू अशी अमानवीय व असंस्कृत मांडणी करणाऱ्या प्रवृत्ती देखील जगात आहेत.

महिला सक्षमीकरणाच्या गप्पा करत असताना महिलांच्या विनयाची, त्यांच्या सन्मानाची काळजी आपण खरच घेतो का ? हाही प्रश्न आहे, आणि आपण जर तशी काळजी घेत असू तर मग आपण अश्लील गाण्यांचा आणि संवादांचा, स्त्रीला उपभोग्य वस्तू समजणाऱ्या प्रवृत्तींचा आणि कलाकृतीच्या नावाखाली मांडणी केलेल्या बाबींचा केव्हा निषेध करणार ?की फक्त निषेधच्या गप्पा करणार ?

स्त्रियांवर अत्याचार करणारा अपराधी आहेच परंतु आपण केव्हा  बिभत्स,अश्लील गाणी, जाहिरातीं विरोधात बोलणार..? या माध्यमातून होणारा अपमान हा विनय भंग नाही का? आपल्या माता भगिनींची काळजी म्हणून त्यांना सातच्या आत घरात येण्याची सूचना आपण करतो आणि त्या सातच्या आत घरात नाही आल्या तर त्यांच्यावर दोषारोप करतो परंतु  ज्यांच्यामुळे त्या संध्याकाळी सात नंतर सुरक्षित नाहीत त्यांना सातच्या आत घरात जाण्याची ताकीद केव्हा देणार..? सरकार त्यांचं काम योग्यरित्या करत असताना जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य अधिक महत्त्वाचे आहे.

थोडक्यात चांगुलपणाच्या आणि अत्याचार झालेल्या बद्दल आरोपयुक्त सहानुभूतीच्या गप्पा  आता पुरे झाल्या. हा लेख वाचून झाल्यावर सर्च करा की चोली के पीछे क्या है आणि चुनरी के नीचे क्या है असे प्रश्न विचारणारे गाण्याच्या आतापर्यंत किती व्ह्यूज आणि लाईक्स झालेत ते.

 आणि या गाण्यांना  सुपरहिट कोणी केले ? विशेष म्हणजे स्वतःला  संस्कृती रक्षक म्हणवणारेही अद्याप तरी ठोस भूमिका घेतांना दिसत नाहीत महिलांवर अत्याचार होण्यास पूरक बाबींचा,वातावरण निर्मितीचा बीमोड कसा करणार ?  बिभत्स,अश्लील गाणी (आइटम सॉंग्स यात आइटम म्हणजे वस्तू कोणाला म्हटल आहे हे आपल्याला माहित असेलच) अशी बिभत्स,अश्लील गाणी सुपरहिट होत असतानाच जगाला मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणाऱ्या परमपूज्य साने गुरुजींच्या 'खरा तो एकची धर्म ' या प्रार्थना गीताचे व्ह्यूज आणि लाईक्स किती झाले तेही आवर्जून बघाच.



अशी बरीच गाणी आहेत...


Abc


 



Tuesday, 16 April 2024

दोन अति लघुकथा..

दोन अति लघुकथा..
देश पारतंत्र्यात असताना तो स्वातंत्र होण्याची स्वप्न पाहणाऱ्या देशभक्त सेनानी असणाऱ्या,हृदयाची जटिल शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या 90 वर्षाच्या वडिलांना टॅक्सी मधून घेऊन जाणारा मुलगा टॅक्सीवाल्याला विनंती करत होता की हळू आवाजात गाणी वाजवा परंतु टॅक्सीतील इतर प्रवाशांसह टॅक्सी ड्रायव्हर यांची दोन विरुद्ध तीन अशी मेजॉरिटी असल्यामुळे शेवटी जोरात गाणी वाजवण्याचा निर्णय कायम झाला आणि कर्णकर्कश संगीताच्या बिट्स चालू राहिल्यात आणि लोकशाहीवादी असणाऱ्या आजोबांच्या बिट्स कायमच्या बंद झाल्या.....
मताधिक्याने झालेल्या निर्णयाच तात्पर्य वाचकांनी ठरवावं की,मानवतावादी विचार महत्त्वाचा की उन्मत्त बहुसंख्यीय भावनाहीन मताधिक्य...
आटपाट नगर होते प्रचंड संख्येने उपस्थित भाविकांची मिरवणूक निघाली होती लोक मोठ्या व्यक्तीभावाने त्यात नाचत होते परंतु मिरवणुकीत सुमधुर गाण्यांच्या ऐवजी कर्णकर्कश घोषणांसह मिरवणूक सुरू होती. अबाल वृद्धांसह विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होत होता पण बोलायला कोणी तयार नव्हत. मिरवणुकीतील एका सहृदयी (?)व्यक्तीच्या हे लक्षात आले परंतु बहुसंख्य लोकांची इच्छा मिरवणूक मोठ्या आवाजातच निघाली पाहिजे अशी असल्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला परंतु असे असले तरी मिरवणुकीतून मात्र बाहेर न पडता मिरवणुकीचाच एक भाग होऊन ती व्यक्तीही नाचू लागली.
आता मिरवणुकीतला तो खरा प्रश्नांकित सह्रदयी मीच असं मिरवणुकीतील प्रत्येकाला स्वतःबद्दल  वाटत असेल तर नवलच.....
(सदर कथा या काल्पनिक असून त्याचा कोणत्याही घटनेशी तसेच कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही तो तसा असल्यास निव्वळ योगायोग समजावा.)

Sunday, 7 April 2024

विद्यार्थी हा विविध सामाजिक घटकांकडून (समाजातून) विविध समाज माध्यमातून,दूरचित्रवाणीवरील भाकड कथांमधून,भाकड अवैज्ञानिक प्रवचनांमधून खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा घेऊनच शाळेत येत असतो.
विद्यार्थी हा शाळेच्या चार भिंती बाहेर समाजा कडून खूप काही शिकत असतो. अशा वेळेला विद्यार्थ्यांना शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला पाहिजे म्हणजे ते ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटनेकडे का? कोठे ? कसे ? अशा जिज्ञासा वृत्तीने बघतील आणि विवेकाने जाणून घेतील.

ग्रहण समज गैरसमज
विद्यार्थ्यांना का? कोठे ? कसे ? अशा पडलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्यात असलेल्या नैसर्गिक जिज्ञासेला, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि प्रत्यक्ष प्रयोगातून, विवेकाने स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे, मग प्रत्येक इयत्तेच्या पाठ्यक्रमात ग्रहणाचा पाठ असो किंवा नसो. कारण अज्ञान,अवैज्ञानिकता, अविवेक   विद्यार्थ्याांची इयत्ता आणि वय लक्षात घेऊन येत नाही मग ज्ञानाने असा विचार का करावा ? ज्ञान हेेे ज्ञानच असते.
विविध वैज्ञानिक प्रयोग आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून ग्रहणांसह सर्वाच घटनांविषयी विद्यार्थ्यांत कार्यकारणभाव समजून घेणे वाढेल आणि गैरसमज दूर होतील.

Wednesday, 3 April 2024

एका एकत्र कुटुंबात आजीने खूप रुचकर स्वादिष्ट स्वयंपाक बनवला होता परिवारात 10 शाळकरी मुलं होती त्यापैकी फक्त तीन मुलांनीच व्यवस्थित जेवण केले.
आजीने सर्व मुलांना आग्रहाने वाढले परंतु उरलेल्या सात मुलांना भूक नव्हती ,खायची इच्छाच होत नव्हती.आजी त्यांना प्रेमाने भरवायला देखील तयार होती आणि आजोबा मात्र आजी वर चिडले आणि आजीने बनवलेला स्वयंपाक आणि घेतलेली मेहनत याचा कुठलाही विचार न करता आजीलाच उलट दोष देऊ लागले.
आजी म्हणाली तुम्ही स्वादिष्ट रुचकर आणि सकस आहार मेहनतीने आणि प्रेमाने बनवू शकतात, खाणाऱ्यांसाठी ताट तयार करून देऊ शकतो.खूप काळजी आणि प्रेम म्हणून तोंडात घासही भरून देऊ शकतो परंतु तो आनंदाने ग्रहण करून,चावून पचवण्याचं काम मात्र मुलांना कराव लागेल अर्थात हे सगळं तेव्हा ज्या वेळेला मुलांमध्ये भूक असेल भूकच नसल्यास ते कसे खाणार.
आजोबांचं जेवण झालं होतं तरीही आजीने बनवलेले एक दोन पदार्थ आजोबांनी मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्यांना शाळेत विद्यादानाचं काम केलेल्या आजीचं म्हणणं पटलं मग आजी म्हणाली कदाचित माझं काही चुकत असेल म्हणून उद्यापासून तुम्ही स्वयंपाक करा आजोबा घाबरल्या आणि ओशाळलेल्या चेहऱ्याने खिडकीतून बाहेर आकाशात चंद्र शोधू लागले... हे माहीत असताना की आज अमावस्या आहे..
शिक्षणाचाही तसंच आहे ज्ञानांर्जनाच आणि शिकण्याची भूकच नसल्यास शिकणार काय...? आपण पुरेशी माहिती न घेता डोक्यात कुठलातरी आकस ठेवून आजी वर ओरडणारे आजोबा तर होत नाही ना ?

Sunday, 18 February 2024

शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता कोण्या एका धर्मा विरोधात नव्हे तर अधर्मा विरोधात होता.

प्रिय नातवंडांनो...
उद्या शिवजयंती उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे त्यानिमित्ताने हा पत्र प्रपंच...
भविष्यात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मत प्रदर्शित करणार असाल किंवा लहान मोठ्या सभेमध्ये व्याख्यान देणार असणार तर हे लक्षात ठेवा की,
शिवरायांचा लढा रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी सत्तांविरोधात होता हे मांडण्यााच भान म्हणजे 'शिव व्याख्यान'...
आणि
नफरतो के बाजार मे मोहब्बत की दुकान... म्हणजे
'शिव व्याख्यान'. या अर्थाने सार्वजनिक शिवजयंती उत्सवात तुम्ही शिवरायांच्या मानवतावादी कल्याणकारी राज्याची भूमिका मांडली पाहिजे.
शिवरायांचा लढा कुण्या धर्माशी किंवा जातीशी नव्हताच तर शिवरायांचा लढा सर्वसामान्य कष्टकरी रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी सत्तां विरुद्ध होता.
शिवरायांचा लढा हा मानव कल्याणकारी राज्यासाठी होता,ज्यात कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्य गोरगरीब,कष्टकरी, शेतकरी,शेत मजुर सर्वांनाच त्यांचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करून देणारा,धर्म आणि जात निरपेक्ष लढा होता.
इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केल्यास हे लक्षात येते की इतिहासातील लढाया ह्या प्रामुख्याने धर्मासाठी नसून सत्तेसाठी होत्या. म्हणून शिवरायांचा वकील जन्मानं मुस्लिम असणारा काझी हैदर होता आणि अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता,ज्याने अफजल खान वधाच्या वेळी शिवरायांवर तलवारीने हल्ला केला होता.त्याचवेळेस जीवा महालाने अफजलखानाचे सहकारी सय्यद बंडा आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा देखील वध केला.
औरंगजेबाच्या मुघल साम्राज्यशाहीकडून लढणारा औरंगजेबाचा सर्वात महत्त्वाचा साथीदार मिर्झाराजा जयसिंग होता.
शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता म्हणूनच शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. शिवराय आणि रयत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. त्यांच्या नौसेनेतील प्रमुख सैनिक अधिकारी सिद्धी संभल,सिद्धी इब्राहीम (आरमार प्रमुख) मुस्लिम होते.
शिवरायांचे चित्र सर्वप्रथम मीर मोहम्मद या चित्रकाराने काढले शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आणि गायला तर दुसरा पोवाडा शाहीर अमर शेख या मुस्लिम शिवशाहीराने गायला.
शिवरायांचा तोफखाना सांभाळणारा शिवरायांवर जीवापाड प्रेम करणार त्यांचा सहकारी इब्राहिम खान होता जो बाजीप्रभू देशपांडे,तानाजी मालुसरे यांच्या सारखा स्वराज्यासाठी प्राणप्रणाने लढत होता.
अठरापगड जातींना सोबत घेणारे शिवराय जात-पात धर्म असा भेद मानत नव्हते म्हणूनच त्यांच्या अंगरक्षकांमध्ये येसाजी कंक,कोंडाजी कंक, संभाजी कावजी,काताजी इंगळे, कृष्णाजी गायकवाड,सुरज कांडके, जीवा महाला,विसाजी मुरंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम देखील होता.
शिवरायांचा पहिला सरनौबत नुरखान बेग हा होता. शिवरायांना अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे अशी खबर देणारा आणि शिवराय अफजल खानाला भेटीला जाणार म्हणून सतत काळजी करणारा,शिवरायांना वाघनखे बनवून देणारा रुस्तुमे जमान या धर्मानं मुस्लिम असणाऱ्या शिवरायांच्या मित्राला विसरून कसे चालेल?
पन्हाळगडावरील सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांना विशालगडाकडे सुखरूप पोहोचवण्यासाठी शिवा काशिद ने आपले बलिदान दिले.हुबेहूब शिवाजी महाराजां सारखाच दिसणारा शिवा काशिद न्हावी होता. आपण मेलो तरी चालेल पण लाखोंचा पोशिंदा असणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे वाचले पाहिजे म्हणून त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली.
शिवरायांच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि सचिव हैदर अली होते. आग्र्याहून सुटकेच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून "राजे आम्ही मेलो तरी चालेल पण स्वराज्यासाठी तुम्ही फार महत्त्वाचे आहात"असं म्हणणारे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद यांचे स्वराज्यासाठी असलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे.
शिवरायांच्या सैन्यात सातशे मुस्लिम पठाण होते. शिवरायांचे दुसरे गुरु सुफी संत याकूब बाबा होते. शिवरायांनी आपल्या सैन्यांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना आपल्या आज्ञापत्रातून केल्या होत्या जसे की मोहिमेवर जात असताना शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेताच्या कडेकडेने जावे उभ्या पिकांमधून जाऊ नये.असे कुठलेही कृत्य करू नये की ज्यामुळे शेतकऱ्यांचे, शेतीमालाचे नुकसान होईल.
शिवराय आपल्या आज्ञापत्रात म्हणतात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील स्पर्श करू नये. कुठल्याही जाती धर्माचे असो त्या सर्व महिला,लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी.
या खेरीज शिवरायांनी आपल्या आज्ञापत्रातून आपल्या सैनिकांना हेही सांगितले की कुराणाची प्रत सापडली तर ती सन्मानपूर्वक आपल्या मुस्लिम बांधवांकडे सुपूर्त करावी तिचा अवमान करू नये.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून सार्वजनिक शिवजयंती उत्सव सर्वप्रथम साजरा करणारे क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले शिवरायांचा उल्लेख कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज असा अगदी यथार्थ करतात.
रयतेचे जाणते राजे शिवराय हे छत्रपती झाले कारण स्वराज्यासाठी प्रतापराव गुजर,कोंडाजी फर्जंद,सूर्यराव काकडे, कान्होजी जेधे,फिरंगोजी नरसाळा, रामजी पांगेरा, हिरोजी इंदुलकर,दौलत खान,वेंटाजी भाटकर, मायनाक भंडारी,तुळाजी आंग्रे, सिद्धी मिस्त्री कान्होजी आंग्रे अजिंक्यतारा झुंजणारे प्रयागजी प्रभू बाजी पासलकर मुरारबाजी नेताजी पालकर आणखी असंख्य अशा लढवय्या मराठ्यांची साथ होती.(या ठिकाणी मराठा जात नाही तर समूह किंवा मराठा समाज ज्यात असंख्य मराठी अमराठी जाती आहेत या अर्थाने)
एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण समाजात विविध धार्मिक आणि जातीय बाबींमुळे तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अफवांवर आपण विश्वास ठेवायला नको कारण अनेकदा सत्तेच्या लढायांना धर्माच्या लढाया दाखवून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातो. इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केल्यास हे लक्षात येते की इतिहासातील लढाया ह्या प्रामुख्याने धर्मासाठी नसून सत्तेसाठी होत्या.
शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता कोण्या एका धर्मा विरोधात नव्हे तर अधर्मा  विरोधात होता म्हणूनच शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. शिवराय आणि रयत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत. कारण शिवशाही म्हणजे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'.
थोडक्यात देशात शांततामय,बंधूभावाचे, सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या समाज माध्यमांचीही मोठी जबाबदारी आहेच. अर्थात या ठिकाणी समाज माध्यम म्हणजे ती तांत्रिक उपकरणे नव्हे , तर अशी तांत्रिक उपकरणे हाताळणारी 'हातं' या अर्थाने आहे. जबाबदार नागरिक आणि समाज शिक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येकाने राष्ट्रहितास प्रथम प्राधान्य द्यावे, त्याची गरज सर्वाधिक आहे. बाकी इतर सारांश पुढील पत्रात मांडणारच आहे तोपर्यंत हे विसरू नका आपलं समाजाशी एकमेकांशी असलेलं नातं हे आई आणि लेकराच्या नात्यासारखं पवित्र असू द्या आणि म्हणूनच त्यासाठी हे सांगावेसे वाटते की,
तुमचं आमचं नातं काय..?
🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩
तुमचा आजोबा
शैलेश✍️