'ओळखलत का भक्तांनो मला'?
ओळखलत का भक्तांनो मला?
तुम्ही मला चार भिंतीत मातीच्या एका विशिष्ट आकारात पाहत आहात पण
मी तर पृथ्वी,जल,अग्नी,वायू,आकाश या पंचतत्वातील कणाकणात होतो,आहे आणि सदैव राहणार,
त्या कणाकणात बघा मला...आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
कर्णकर्कश गोंगाटात नव्हे तर
शांत,संयमी ध्यानधारणेत अनुभवा मला
आणि खरंच सांगा ओळखलंत का भक्तांनो मला ?जात,धर्म,लिंग असा भेद न करता मानवता स्थापन करणाऱ्या प्रत्येक
प्रयत्नात मी आहे त्या प्रत्येक प्रयत्नात बघा मला.... आणि खरंच सांगा ओळखलं का
भक्तांनो मला ?
माझ्या लेकींची धिंड पाहणाऱ्या संवेदनाहीन झुंडींचा भाग
होणाऱ्यांनो, तुम्ही मला कधी पाहणार ? मी तर लेकींसाठी लढणाऱ्या प्रत्येक बापात आहे,त्या लेकींच्या निष्पाप नजरेतून बघा मला.. आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
धर्मांधतेने माखलेल्या तिरस्काराच्या भिंतीवरील रूधिरांच्या धारा पाहून आसुरी आनंद घेणाऱ्या प्रवृत्तींनो, आसुरी,अविवेकी धर्मांधतेच्या संहारात बघा मला आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ? जाती-धर्म आणि स्त्री-पुरुष असा भेद न करता.
समतेच्या घटनेची आणि घटनेच्या समतावादी मांडणीत मी आहे,मांडणी करणार्या त्या हातांमध्ये बघा
मला आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
एक राजा म्हणून 'माझे प्राण आणि माझी प्रतिष्ठा' माझी जनताच आहे.
'माझ्या नावाने होणाऱ्या तुमच्या सोहळ्यात' माझे प्राण आणि प्रतिष्ठा असणारी 'माझी शबरी आई' दिसली नाही मला ..
आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
फक्त एक आणि एकाच रंगात आणि ढंगात निर्माण आणि स्थापित करू पाहणाऱ्या संकुचित मानवताद्रोह्यांनो 'फोडा आणि राज्य करा' या परकीय नीतीत नाही, तर विविधतेत एकात्मतेच्या रितीत बघा मला...आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
चुकीला चुकीच योग्य ला योग्य असं परखड
पद्य,गद्यातील वाणी आणि लेखणीत बघा मला आणि खरंच सांगा ओळखलं का भक्तांनो मला ?
✍️
'शैलेशकमल'
'रुद्रम रणम रुधिरम'
(Telugu, meaning "Rage, War, Blood") and Rise Roar Revolt (English/Hindi). Courtesy Netflix
तुम्ही कुठेतरी साहेब झालात,अधिकारी झालाय आता तुम्हाला रुबाबात मिरवता येईल म्हणून नव्हे तर आता तुम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो.
माझ्या विद्यार्थी मित्रांनो कुठलाही अहंभाव न ठेवता हे लक्षात असू द्या की,आपली निवड 'लोकसेवेतून' झाली आहे. म्हणून तुम्ही बॉस जरूर आहात परंतु अधिकाधिक लोकांसाठी सेवा देणारे बॉस.पदाच्या अहंभावनेतून रुबाब लादणारे बॉस नव्हेच. लोक तुम्हाला तुम्ही आदर्श आहात म्हणून आदर भावनेतून (Reverence) घाबरत नसतील आणि तुम्ही तुमच्या पदाच्या माध्यमातून त्यांना त्रास देऊ शकतात या भीतीपोटी घाबरत असतील तर हे योग्य होणार नाही कारण अशा मुळे देश स्वातंत्र्य झाल्यावरही जुलमी राजवटीचा भास होत राहील... खरं म्हटलं म्हणजे साहेब हा शब्द ब्रिटिश काळात गोऱ्या साहेबांसाठी आपण मोठ्या प्रमाणात वापरत होतो.
इंग्रजांच्या काळात जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी एका रुबाबात मिरवत होता आणि तो रुबाब ब्रिटिश साम्राज्यशाहीच नेतृत्व करणार होता असे सर्वसाधारण चित्र भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश राजवटीचे होते . भारतीयांना तुच्छ समजणाऱ्या प्रवृत्तीचे तेतृत्व करणाऱ्या गोऱ्या साहेबाचे दुर्गुण आपल्यात नको. भारत देश गुलाम असल्यामुळे मेहरबान साहेबास अत्यंत लीन दिन होऊन पत्र लिहिली जात होती (मेहेरबान साहेबांच्या सेवेत अशा आशयाने )मुजरे केले जात होते परंतु माझ्या प्रिय नातवांनो तुम्ही ज्या देशात अधिकारी झाला आहात तो देश आता स्वातंत्र्य झाला आहे आणि तुम्ही साम्राज्यशाही व्यवस्थेचे क्रूर अधिकारी नाहीत. स्वतःच्याच देशात स्वतःच्याच बांधवांच्या सेवेसाठी, त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पदावर आहात ,तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदासाठी तुम्ही लोकसेवा आयोगातून अधिकारी झालेला आहात यातील सर्वात महत्त्वाचा शब्द 'लोकसेवा' हा आहे म्हणून तुम्ही लोकांचे सेवक आहात. शक्य झाल्यास तुमच्या कार्यालयाबाहेर तुमचा हात जोडलेला फोटो लावा आणि त्या खाली लिहा May I help you..
In your service - xyz. मित्रानो तुम्ही पास झाल्याबरोबर तुमच्या मध्ये तुम्हाला मिळणाऱ्या पदाचा गर्व अहंकार येऊ देऊ नका. लोकांनी तुम्हाला सलाम करण्यापेक्षा तुमच्याकडे येणाऱ्या माणसांना तुम्ही लोकसेवक म्हणून स्वतः सलाम करा. कारण पूर्वी पारतंत्र्यात लोक लिनदिन हीन होऊन या पदांना सलाम करत होते गुलामासारखे राबत होते ती परिस्थिती आता नाही कारण आता भारत हा देश स्वतंत्र आणि सार्वभौम झाला आहे.ब्रिटिशांची किंवा कुठल्याही राजवटीची गुलामगिरी आता नसल्यामुळे तुम्ही राजवटीचे क्रूर अधिकारी न होता नम्रतापूर्वक स्मित हास्य करून लोकांच्या समस्या सोडवा कारण तुम्हाला देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा तुम्ही परीक्षा पास झाला म्हणून नव्हे तर तुम्हाला अधिकाधिक लोकांची सेवा कमी वेळात, सुविधाजनक परिस्थितीत करता यावी यासाठी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत हे नेहमी ध्यानात ठेवा. तुमच्या ठाई रुबाब असावा पण तो रयतेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या छत्रपती शिवरायांसारखा जे सर्वसामान्य रयतेचा, कष्ट करणाऱ्या शेतमजूर आणि शेतकऱ्यांचा मानवतावादी दृष्टिकोनातून सदैव विचार करत असत.
तुमची लायकी तुमच्या ज्ञानावर आणि तुम्ही जगात असलेल्या मानवतावादी विचारांवर असते ती तुमच्या पदांवर नसते हे लक्षात ठेवा. पद ही संधी आहे तिचं न्याय मार्गाने लोकांची सेवा करण्याच्या दृष्टीने सोनं करा. तुमच्या चुकीच्या वागण्या बोलण्यामुळे लोकांना आज लॉर्ड एक्टन यांच एक वाक्य आठवायला नको जात ते म्हणतात
"Power corrupts and absolute power corrupt absolutely."
- तुमचा आजोबा तुमचा सुलभक
शैलेशकमल
"May I help you?" should be your attitude and duty as the most powerful servant of society for humanity.
चित्तोड (राजस्थान) चे माजी कलेक्टर IAS अधिकारी डॉ. समित शर्मा यांची आपल्या 'सत्यमेव जयते' या प्रेरणादायी कार्यक्रमात आमिर खान यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग. साभार🙏 Courtesy and Special Thanks 🙏 Satyamev Jayate 👇
आज दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी परिपाठात भयंकर अनुभव आला.
विश्वरत्न भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या विनम्र अभिवादनानंतर
विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना परिपाठात प्रश्न विचारला की एखाद्या व्यक्तीला किरकोळ अपघात झाल्यास तुम्ही काय काय उपाययोजना कराल ?कशा पद्धतीने मदत कराल?
सर्वसाधारणपणे अशा वेळेला प्रथमोपचार करू, अपघात झालेल्याला धीर देऊ,उपचारांसाठी दवाखान्यात नेऊ वगैरे वगैरे अशी उत्तरे येत असतात परंतु आज भयंकर उत्तर आलं. उत्तर असं होतं की, आम्ही अपघात झालेल्या व्यक्तीला एक लोटा जल अर्पण करायला सांगू म्हणजे तो लवकर बरा होईल आणि त्याच्या सर्व समस्या दूर होतील हे उत्तर ऐकून शिक्षक एकमेकांकडे बघू लागले आणि त्याच वेळेला वातावरण ढगाळ होत मी आकाशाकडे बघत होतो आकाशात नको असलेल्या ढगांच्या गर्दीतून लख्ख सूर्यप्रकाशासाठी ...
विद्यार्थ्यांना शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन जरी शिकवला जात असला तरी विद्यार्थी हा विविध सामाजिक घटकांकडून (समाजातून) विविध समाज माध्यमातून,विविध माध्यमावरील भाकड कथांमधून खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा घेऊनच शाळेत येत असतो. कारण विद्यार्थी हा शाळेच्या चार भिंती बाहेर समाजा कडून खूप काही शिकत असतो..
विद्यार्थ्यांसह समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवून अंधश्रद्धा नाहीशी करण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न करावे लागणार आहे ,त्यासाठी राज्यघटनेनुसार कायद्याच मोठ पाठबळ आपल्याला आहे हे विसरता कामा नये.आपली भारतीय राज्यघटना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत अपेक्षा करते (There is one duty that is unique to India under Article 51A (h) that encourages the citizen to “develop scientific temper, humanism and the spirit of inquiry and reform".)
*'वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधकबुद्धी,सुधारणावाद मानवतावाद याचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.* वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी शिक्षकांची आणि सर्वच व्यवस्थांची जबाबदारी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपल्याला वैयक्तिक धर्म स्वातंत्र्य असलं तरी सामुदायिक मानवतावाद आणि विवेकवादास ते बाधक होता कामा नये...
म्हणून प्रत्येक व्यक्तीने आणि सर्वच माध्यमांनी जबाबदारीने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे भान ठेवले पाहिजे आणि अवैज्ञानिक,अंधश्रद्धा वाढवणाऱ्या बाबींचा प्रचार प्रसार आणि उदात्तीकरण न करता विरोध केला पाहिजे.
प्रिय नातवांनो आज आपण विश्वचषकाचा अंतिम सामना गमावला.खेळात हरलात तर हरकत नाही पण थोतांड असणाऱ्या अवैज्ञानिक भाकितांवर आणि अंधश्रद्धेवर मात्र विश्वास ठेवू नका.हरण्याच्या निमित्ताने आपण एवढे जरी शिकलो तरी पुरे आहे विज्ञान नसणाऱ्या अवैज्ञानिक खोटे भविष्य सांगणार्यांवर अति विश्वास ठेवू नका.विश्वगुरू असणारा आपला भारतच अंतिम सामना जिंकेल असं नामवंत म्हणवणारे ज्योतिषी भारतीय संघाची आणि खेळाडूंच्या कुंडल्या काढून दावे करत होते आज ते सर्व दावे आणि त्यांनी मांडलेल्या कुंडलीच्या माध्यमातून त्यांचे भविष्य भाकीत देखील खोटं ठरल आहे म्हणून आपला भारतीय संघ हरला तर हरकत नाही या निमित्ताने भारतीयांना हे कळेल की अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही ज्यामुळे अंधश्रद्धा वाढते.
प्रिय नातवंडांनो तुम्ही नेमकं
काय वाचतात,वागतात यावर हे ठरतं की तुम्ही सुशिक्षित की केवळ साक्षर. कारण
सुशिक्षित माणूस विज्ञानाचा प्रचार,प्रसार व अंगीकार करणाऱ्या विवेकवादी विचारांचा
वाहक असतो अस मी व्यक्तिशः मानतो. हजारो वर्षापासून भोळ्या भाबड्या लोकांना खऱ्या
ज्ञानाची, साक्षरतेची कवाडं बंद करणाऱ्या व्यवस्थेला लोकांना साक्षर करायचेच
नव्हते.
माणसाला माणूस म्हणून घडवणाऱ्या तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा
फुले,क्रांतीज्योती सावित्रीआई फुले या सारख्या समाज सुधारकांच्या प्रयत्नांनी लोक
साक्षर होऊ लागले. समाजसुधारकांच्या प्रयत्नांनी लोक हळूहळू साक्षर होत असले तरी
साक्षर झालेल्या लोकांनी काय वाचावे याची योजना लोकांना मानसिक,बौद्धिक,वैचारिक
गुलाम बनवणाऱ्या व्यवस्थेकडे होती. लोकांना हुशार ज्ञानी न होऊ देता कायम गुलाम
बनवून ठेवण्यासाठी अंधश्रद्धा कर्मकांड मोह,लालसा, तसेच भीतीत गुंतवून ठेवण्यासाठी
विज्ञान नाकारणाऱ्या अविवेकी भाकडकथांची, कर्मकांडांनी युक्त असेच ग्रंथ योजले तसेच
मौखिक स्वरूपातही अशाच विज्ञान नाकारणाऱ्या अविवेकी, अतार्किक कथा सांगितल्या.
मानवाला नैसर्गिकरीत्या सर्वसाधारणपणे संगीत आवडते म्हणून अंधश्रद्धा,कर्मकांड आणि
भाकडकथांना संगीताची जोड दिली. लोकांना माणसाला गोष्टी ऐकायला खूप आवडतं आणि त्या
गोष्टींमध्ये चमत्कार असेल रंजकता असेल तर मनोरंजनासाठी का होईना निसर्गतः
प्रत्येकाला ते आवडतं पण त्याला किती खर मानायचं ? की फक्त मनोरंजक म्हणून घ्यायच
हेही महत्त्वाचं आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे ज्या व्यवस्थेने वर्ण व्यवस्था,जातीव्यवस्था
निर्माण करून माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाकारले,स्त्रियांचे अधिकार,समता
नाकारून ज्यांचे अधिकार अमान्य केले तेच लोक हे असे ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचत आहेत.
लोकांना भीती,लालसा निर्माण व्हावी यासाठी भाकडकथा रचल्या. कथेत नेमका चमत्कार का
झाला आणि कसा झाला ? याचा वैज्ञानिक आधार कुठलाच नसतो एवढंच काय परंतु या
कर्मकांडांनी युक्त भाकड कथांवर प्रश्नही विचारायचा नसतो त्याचा स्वीकार करा असाच
मंत्र,कारण प्रतिप्रश्न विचारायचा नाही.
नातवंडांनो व्यवस्थेने तुम्हाला शिकण्याचा
अधिकार हजारो वर्षांपासून दिला नव्हता तो तुम्हाला मिळाल्यानंतर ज्या व्यवस्थेने
तुम्हाला शिक्षण नाकारले त्या व्यवस्थेचीच भाकडकथांची पुस्तकं तुम्ही वाचणार असाल
तर मग तुम्ही फक्त साक्षर सुशिक्षित नाहीतच हे ध्यानात ठेवा.कारण जे तर्क करायला
लावत, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासतं, कुठलाही भेदभाव न करता मानवतावाद पेरत ते
शिक्षण. जे गुलाम बनवत ते शिक्षण कधीही होऊ शकत नाही. तुमची पिढी आमच्या
पिढीपेक्षाही अधिक विज्ञानवादी असली तरी मी तुम्हाला हे का सांगतोय असा प्रश्न
तुम्हाला पडला असेल परंतु लक्षात ठेवा गुलाम बनवणारी व्यवस्था हजारो वर्षापासून
अस्तित्वात आहे. नॅनो टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या युगातही गुलाम
बनवणाऱ्यांची कार्यपद्धतीत आधुनिकता आली आहे फक्त साधनं बदलली आहे पण प्रवृत्ती तीच
आहे. त्यातील गंमत म्हणजे ही व्यवस्था आधुनिक काळात विज्ञानाच्या उपयोगाने
वैज्ञानिक साधनांच्याच वापराने अंधश्रद्धा चमत्कारांचे उदात्तीकरण करून वैज्ञानिक
दृष्टिकोन नाकारत आहे. तेव्हा कायमच सजग रहा केवळ साक्षर म्हणून ओळख न ठेवता
सुशिक्षित अशी ओळख ठेवा,कारण काळ कोणताही असो दुर्जनांच्या क्रियेशीलतेपेक्षा
सज्जनांच्या निष्क्रियतेची जास्त भीती असते. तुम्हा सगळ्यांना साक्षरता दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा... तुमचे आजोबा शैलेश.